रेड अलर्ट जारी...सांगली शहरात कृष्णेचे पाणी शिरायला सुरुवात - महाराष्ट्र मान्सून
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येणाऱ्या 48 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात दमदार पाऊस होणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे - राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येणाऱ्या 48 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात दमदार पाऊस होणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणं भरली आहेत. त्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत कृष्णेच्या वाढत्या पातळीमुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसेच मनपा आयुक्तांनी स्थलांतरित व्हा, अन्यथा घरं सील करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे चिपळूण, राजापूरमध्ये पूरस्थिती असून वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई, पालघर आणि पुण्यात भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबणार आहे. या दोन विभागांसह राज्यात इतरत्र 20 ते 22 ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्य़ापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. यंदा राज्यातील पाऊस सरासरीच्या पुढे गेला आहे. वारणा, राधानगरी, दूधगंगा, तुळशी, कुंभी, कासारी, उरमोडी, धोम, कण्हेर, तारळी यांसह बहुतेक जलसाठे ओसंडून वाहत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अलमट्टी धरण देखील भरले आहे.
सांगली
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या कृष्णेची पाणी पातळी ही 33 फुटांवर पोहचली आहे. तर शहरातील पूर पट्ट्यात नदीचे पाणी घुसू लागले आहे. संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीच्या आयर्विन पुलावरील पाण्याची पातळी सकाळी 10 वाजता 33 फुटांवर पोहोचली होती. या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील दत्त नगर, काका नगर आणि सुर्यवंशी प्लॉट याठिकाणी कृष्णा नदीचे पाणी घरात घुसायला सुरुवात झाली आहे. कृष्णेची इशारा पातळी ही 40 तर धोका पातळी ही 45 फूट आहे.
नंदुरबार
मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात पावसाची 35% तूट भरून निघाली आहे. त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाबारी धरण व विरचक धरण पूर्णपणे भरले आहेत. या काळात नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर उर्वरित तीन तालुक्यांमध्ये 50 मिली पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे वीरचक्र आणि आंबेबारा धरण भरले असून वीरचक्र धरणातून 512 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
ठाणे
पावसाच्या रिपरिप मुळे रविवार पर्यत सरासरी २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. यापैकी १७ मिमी, कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२ मिमी पाऊस पडला आहे.
बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणात रविवारपर्यंत सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी, खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगांव ८३ आणि ठाकूरवाडी ५० मिमी. सर्व साधारण पावसाची नोंद झाली आहे. आता या धरणाची पाणी पातळी ६८.९६ मीटर आहे. या धरणात अजून ३.६४ मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी या धरणात आज ७१.२२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो १००.११ टक्के होता. बारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात येणार आहे.