पुणे - पुण्याच्या सहकारनगर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एक दिवसाच्या चिमुरड्याला ओढ्याच्या पाण्यात फेकून देण्यात आले होते. परंतु स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने या चिमुरड्याचे प्राण वाचवण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या निर्दयी मातेचा शोध घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिली मायेची ऊब
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ओढ्यामध्ये एक दिवसाचा चिमुरडा रडत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या दत्तवाडी पोलिसांनी या चिमुरड्याला ओढ्याच्या पाण्यातून बाहेर काढले. महिला पोलिसांनी त्याला मायेची उब देताच त्याचे रडणे बंद झाले. पोलिसांनी नंतर या चिमुरड्याला ससून रुग्णालयात दाखल केले.
गुन्हा दाखल
या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी या निर्दयी मातेचा शोध सुरू केला. दत्तवाडी परिसरातील अनेक भाग पिंजून काढल्यानंतर एका चाळीस वर्षीय महिलेविषयी माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता अनैतिक संबंधातून या महिलेने बाळाला जन्म दिला होता. समाजात होणारी बदनामी टाळण्यासाठी तिने या बाळाला उघड्यावर फेकून दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी ती ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून आले. तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.