पुणे - लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्यासाठीचा उपाय नाही. त्यामुळे पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याला फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचा विरोध असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी म्हटले आहे. दुकाने बंद ठेवणे हा कोविड-19 वर उपाय नसल्याचे सांगताना त्यांनी दुकाने बंद ठेवल्याने कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत, असे म्हटले आहे.
मागील 3 महिन्याच्या अनुभवावरून लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा उपाय नसल्याचे आपल्या लक्षात आले आहे. असे असतानाही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावी का, असा सवालही फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा - पुण्यात 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 'लॉकडाऊन'
दिनांक 13 जुलै ते 23 जुलै या दहा दिवसांचा कालावधीत लॉकडाऊन करण्याचा जो निर्णय जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्याला पुणे फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने याआधी पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन करणे व्यापाऱ्यांना परवडणारे नाही. कारण व्यापाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे लागतात. कर्जाचे हप्ते द्यावे लागतात. विजेचे बिल द्यावे लागते. दुकान भाडे, घर खर्च अशा अनेक प्रकारचा खर्च व्यापाऱ्यांना आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास ही मोठी आर्थिक झळ व्यापाऱ्यांना सोसवणार नाही, असे फत्तेचंद रांका यांनी म्हटले आहे.
गेले तीन महिन्यातील लॉकडाऊनचा फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनने बारकाईने अभ्यास केला असून दुकाने बंद ठेवणे हा कोविड-19 वर उपाय नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी होत नसतानाही व्यापाऱ्यांनी दुकाने का बंद ठेवायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याउलट नागरिक प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'सारथी'बाबतचे आश्वासन अजित पवार पूर्ण करतील असा विश्वास - राजेंद्र कोंढरे