पिंपरी-चिंचवड/मावळ - केंद्र सरकारने रासायनिक खतांचे दर वाढविल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अगोदर निसर्ग चक्रीवादळ त्यात अवकाळी पाऊस आणि पुन्हा तौक्ते वादळामुळे मावळमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
हातातोंडाशी आलेला घास वादळ वारे, पावसाने हिरावून घेतला तर दुसरीकडे केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी शेतकरी संघटनेने जुना मुंबई-पुणे महामार्गावर सोमाटणे फाट्यावर केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून आक्रोश जन आंदोलन केले आहे.
'दरवाढ मागे घ्या अन्यथा, एक्स्प्रेस वे अडवून धरू'
मोदी सरकारच्या घणाघाती निर्णयामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. प्रत्येक गोणीमागे 700 रुपये खतांची दरवाढ मागे घ्यावी अन्यथा, यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे अडवून धरू, एक ही वाहन या मार्गावर जाऊ देणार नसल्याचा धमकीवजा इशारा मावळ तालुक्यातील पोशिंद्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री यांच्या भोंगळ निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - म्यूकरमायकोसिस रूग्णांवर होणार मोफत उपचार, राज्य सरकारने कंबर कसली