पुणे - पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करावी. प्रकरण दाबू नये. या प्रकरणात संशयाचे वर्तुळ तयार झाले आहे, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुण्यातील पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यांच्या नावाची चर्चा होत असल्याने भाजपने हे प्रकरण लावून धरले आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
महापालिका निवडणूक स्वबळावर जिंकू-
पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाकडून केल्या गेलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत समाधानी आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच येत्या महापालिका निवडणुकीत आम्हाला नवीन मित्र जोडण्याची गरज नाही आम्ही स्वबळावर जिंकू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
तसेच पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या रोना विल्सन यांच्याबाबत वॉशिंग्टन पोस्ट मध्ये छापून आलेला अहवाल हा खासगी संस्थेने केलेला अहवाल आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी या खासगी संस्थेला रोना विल्सन यांनीच काम दिले होते, असे देखील फडणवीस म्हणाले. हा अहवाल सरकारने फेटाळला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- उमेश कामतने दिली होती 'ही' ऑफर; पॉर्न प्रकरणी मॉडेलचा खळबळजनक खुलासा