पुणे : मराठा नेतृत्व म्हणून शरद पवार यांचा उगम झाला. मराठा समाजासाठी ते काहीतरी करतील म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना आजवर निवडून दिले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. ते तीन ते वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. इतके असूनही त्यांना मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेता आला नाही. शरद पवारांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवले, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने
संजय काकडे यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पवारांवर टीका केली. भारतीय जनता पक्ष सुरवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री होते, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 35 वर्षांत जे जमले नाही ते त्यांनी करून दाखविले. देवेंद्र फडणीस यांनी दिलेले आरक्षण या सरकारला टिकवता आले नाही. या सरकारने जर न्यायालयात व्यवस्थीत बाजू मांडली असती, तर मराठा समाजाचे चाळीस-पन्नास वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले असते. त्यामुळे आता राज्य सरकारने राजकारण न करता मराठा आरक्षणासाठी ते काय करणार आहेत हे स्पष्ट करावे असे काकडे म्हणाले.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील
मला उद्धव ठाकरेंचा स्वभाव पूर्णपणे माहिती आहे. ते या तीन पक्षांच्या खिचडीत अडकले आहेत. त्यांचे प्रत्येक विधान पाहिले असता ते गुदमरत असल्याचे लक्षात येते. आज ना उद्या ते महाविकास आघाडीतून बाहेर पडतीलच. त्यांचा स्वभाव त्यांची संस्कृती मला संपूर्ण माहिती आहे. तीस वर्षांपासून ते भाजपसोबत राहिले आहेत. महाविकास आघाडीत ते किती दिवस राहतील हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे असेही काकडे म्हणाले.