पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणीवर तिच्या फेसबुकवरील मित्राकडून लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या घटने प्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलिसांत तक्रार दिली असून तरुणाविरोधात बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद महेश कवडे (वय 25, रा. दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी प्रसादने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2018 ते 25 मे 2020 या कालावधीत आरोपीने हॉटेल, स्वतः च्या घरी, मित्राच्या घरी आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडित तरुणीवर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून इच्छे विरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडित तरुणी गर्भवती राहिली. आरोपीने तिच्या संमतीशिवाय तिचा गर्भपात केला.
पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत तरुणीने भोसरी पोलिसांत धाव घेत तरुणावर शारीरिक अत्याचार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे करत आहेत.