पुणे - आमच्याकडे चांगले विमान असते, तर निकाल काही वेगळा लागला असता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यांनी इंडिया कॉनक्लेवमध्ये केलेले वक्तव्य हे अनावधानाने नसून राजकारण करण्यासाठी केलेले विधान आहे. त्यामुळे पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यात आपली हार झाल्याचेच मोदी यांनी मान्य केले असून त्यांच्या या विधानाचा आपण तीव्र निषेध करत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
भारतीय वायुदलाकडून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर सर्व विरोधकांनी सरकारला पाठिंबा दिला. मात्र पंतप्रधान मोदी या हल्ल्याच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करत होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांत हल्ल्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अनेक लोक आता या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
हवाई दलाकडून अधिकृत माहिती आलेली नाही, तरीही भाजपाध्यक्ष अमित शाह तीनशे- साडेतीनशे दहशतवादी मारले म्हणत अकलेचे तारे तोडत असल्याचा टोलाही यावेळी चव्हाण यांनी लगावला आहे. आपल्याकडे चांगले विमान असते, तर निकाल वेगळा लागला असता, असे म्हणणे म्हणजे हा आपल्या सैन्याचा, हवाईदलाचा अपमान असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधानांनी राफेल विमानाचा विषय यामध्ये घातला. राफेल विमान असते तर आपला विजय झाला असता, असे पंतप्रधान सूचित करतात. हे अत्यंत निंदनीय असून त्यांनी माफी मागितली पाहिजे असेही चव्हाण म्हणाले.दुसरीकडे या हवाई हल्ल्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अकलेचे तारे तोडत आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था या हल्ल्याबाबत काही वेगळे सांगत असताना, कुठल्याही पुराव्याशिवाय अमित शाह वेगवेगळे दावे करत असल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले.