पुणे : 1928 मध्ये पुण्यात जगातील सर्वात पहिला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Shivaji Maharaj Equestrian Statue ) पुण्यात उभारण्यात आला. हा पुतळा पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात आहे. पुतळा उभारण्याची मूळ कल्पना राजर्षी शाहू महाराजांची ( Rajarshi Shahu Maharaj ) होती. आपल्या वडिलांची ही इच्छा छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केली. याबाबतची माहिती शिवजन्म उत्सव समितीचे अध्यप्रवर्तक संस्थापक अमित गायकवाड यांनी दिली.
ही आहेत शिवरायांच्या पुतळ्यांची वैशिष्टये
हे काम ख्यातनाम शिल्पकार श्री गणपतराव म्हात्रे यांना दिले. तर करमरकर यांनी पॅनेल्स तयार करायचे ठरले. या पॅनेल्सवरती शिवरायांचे शौर्य, राजकारणपटुत्त्व, धर्मावरील श्रद्धा आणि नितीमत्ता दाखवायची होती. म्हात्रे यांना काम वेळात पूर्ण करणे अशक्य दिसू लागले. म्हणून हे काम करमरकरांनी वेळेत पूर्ण करण्याचे छत्रपती राजाराम महाराजांनी सांगितले. पुढे करमरकरांनी अखंड पूर्णाकृती अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बनवला. या पुतळ्याची उंची साडे तेरा फूट उंच असून तेरा फूट लांब हा पुतळा आहे. आणि साडे तीन फूट रुंद हा पुतळा आहे. या पुतळ्याच्या हातातील 54 इंचाची तलवार आहे. पूर्ण पुतळा हा आठ टनाचा आहे. हा ब्रॉंझ धातू मधला ओतीव पुतळा असून या बनवण्यासाठी 16 टन धातू लागला. पुण्यात छत्रपतींचा पुतळा आणल्या नंतर पुतळा ओढण्यासाठी रणगाडा आणि २० बैलगाड्या जुंपण्यात आल्या. तरीही पुतळा पुढे नेणे अशक्य झाल्यानं नगरपालिकेचा स्टीम रोलर बोलवण्यात आला.आणि हा पुतळा बसवला गेल्याची माहिती संस्थापक अमित गायकवाड यांनी दिली.