पुणे - पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून पर्यायी इंधन परिषदेचे ( Pune Fuel Council ) आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Pune Fuel Council Visit ) यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर या परिषदेमध्ये इंधनाला पर्याय म्हणून जे जे उपकरणं असतील, त्या सार्यांचे प्रदर्शनदेखील भरले आहे. या इंधन परिषदेचा प्रदर्शनात सगळ्यात जास्त चर्चा होत आहे, ती इलेक्ट्रिक बैलाची. ( Electric Bull ) होय नाशिकच्या एका दांपत्याने बनवला आहे, चक्क इलेक्ट्रिक बैल.
भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो. शेती हा पूर्वीपासूनच भारताचा एक प्रमुख व्यवसाय राहिला आहे. पण याच कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना मोठे काबाड कष्ट करत रात्रंदिवस शेतीसाठी राबाव लागत. जसा शेतकरी मालक शेतात राबतो, तसचं त्याच्या बैलालादेखील आपल्या मालकासोबत रात्रंदिवस शेतीसाठी काबाडकष्ट करावे लागतात. पण नाशिकच्या तुकाराम सोनवणे यांनी एक भन्नाट कल्पना राबवत लॉकडाऊन मध्ये सुचलेल्या कल्पनेतून इलेक्ट्रिक बैल बनवला आहे.
कोळपणीपासून नांगरणी पर्यंत सगळी कामे होणार - नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदर्सूल या लहान गावातून आलेल्या तुकाराम सोनवणे या तरुणाने पत्नी सोनालीच्या मदतीने ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. बैलाच्या मदतीने करण्यात येणाऱ्या कोळपणी, पेरणी, भांगलनी अशी अनेक मशागतीची काम हे म्हणजेच इलेक्ट्रिक बैल करु शकतात. विशेष म्हणजे हे वापरत असताना इतर कुठल्याही इंधनाच्या तुलनेत यावर होणारा खर्च हा सुमारे 70 टक्के कमी होणार आहे, असा दावा देखील तुकाराम सोनावणे यांनी केला आहे.
अशी सुचली भन्नाट कल्पना - तुकाराम लहान असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांनतर तुकाराम यांनी शिक्षणासाठी शहराची वाट धरली. लॉकडाऊनमध्ये मात्र आपलं गाव बरं म्हणत गावाकडे परतले. ६ महिने शेती केल्यानंतर बैलांची, मजुरांची अडचण त्यांना जाणवू लागली. यावर पर्याय शोधायला हवा म्हणून त्यांना या इलेक्ट्रिक बैल तयार करण्याची कल्पना सुचली आणि ही संकल्पना साकार झाली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतूक - पुण्यात सुरु असलेल्या पर्यायी इंथन परिषदेत त्यांनी हे उपकरण विक्रीस ठेवलं आहे. हा अनोखा इलेक्ट्रिक बैल प्रदर्शनात बघितल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचंड प्रभावित झाले असून राज्य सरकारच्या पोखरा योजनेतून हा इलेक्ट्रिक बैल शेतकऱ्यांना देता येऊ शकेल, अस म्हणत त्यांनी तुकाराम यांना मुंबईलादेखील बोलावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात होणाऱ्या मोठ्या वाढीमुळे सामान्य नागरिक हैराण आहेतच अशातच शेतकऱ्यांनादेखील याचा मोठा फटका बसतो आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही अनोखी इलेक्ट्रिक बैलाची कल्पना तुकाराम घेऊन आले आहेत.
हेही वाचा - Murder Of Girl Student : भरदिवसा 200 फुट ओढत नेऊन विद्यार्थिनीची हत्या