पुणे- शहरासह परिसरात पावसाची संततधार सुरुच असून मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रात पाऊसाची नोंद झालीय. त्यामुळे धरणक्षेत्रांतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पुण्याला लागून असलेले खडकवासला धरण काही दिवसांपूर्वीच शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नुकताच हा विसर्ग वाढविण्यात आला असून 16 हजार 427 क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडणे सुरु आहे.
पुणे शहरातील मुठा नदीवरिल बाबा भिडे पूल पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासून पोलीस प्रशासनाकडून पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. मनपा प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. या पुलावर रहदारी करण्यासाठी प्रशासनाने बंदी घातली असली तरी भिडे पुलावर पाणी पाहण्यासाठी काही पुणेकर हजेरी लावत असल्याचे दिसून आले.
गेल्या काही तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, नीरा देवघर, चासकमान, भाटघर,उजनी आदी धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पावसाची संततधार सुरु असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीतील पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला 9415 क्युसेकने मुठा नदीत विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर ११ हजार ७०५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पावसाचा जोर कायम राहिल्याने आज रात्री पाण्याचा विसर्ग 16 हजार 427 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे हा विसर्ग करण्यात आला असून संततधार पाऊस कायम राहिल्यास हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.