पुणे - देशातील अनेक नेत्यांवर, न्यायाधीशांवर, अधिकाऱ्यांवर तसेच पत्रकारांवरही केंद्र सरकारने 'पेगासस(pegasus)'च्या माध्यमातून पळत ठेवली आहे. सरकारच्या हाती अशी पळत ठेवण्याची ताकद येणे भयंकर आहे. लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून रामायण झाले, द्रौपदीचे वस्त्रहरण झाले म्हणून महाभारत झाले, तसे आता मोदींनी सर्व पापांची सीमा ओलांडली आहे, अशी टीका ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी (kumar saptarshi) यांनी केली आहे.
हेही वाचा - Pegasus Snooping : इस्रायलमध्ये गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची होणार चौकशी
प्रकरण गंभीर
इस्त्रायल देशातील एका खासगी कंपनीचे सॉफ्टवेअर वापरून देशातील अनेक नेत्यांवर, न्यायाधीशांवर, अधिकाऱ्यांवर तसेच पत्रकारांवरही केंद्र सरकारने पळत ठेवण्याचे प्रकरण गंभीर आहे. केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
'हा संविधानाचा अवमान'
केंद्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाचा अवमान केला. न्यायपालिका, संसद, प्रशासन व प्रसारमाध्यमे हे आपल्या लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत. विदेशातील एका खासगी कंपनीचे "Pegasus" नावाचे सॉफ्टवेअर वापरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, देशाचे निवडणूक आयुक्त, विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सरकारमधील मंत्री तसेच अनेक पत्रकारांवर पळत ठेवून केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लोकशाहीच्या चारही स्तंभांना सुरुंग लावला आहे. अनेक देशबांधवांच्या बलिदानाने उभी राहिलेली ही लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व गोपनीयता या देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करून केंद्रातील हुकूमशाही सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाचा अवमान केला असून ही बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - पेगाससची हेरगिरी नवीन नाही.. 125 वर्षापासून होत आहे फोन टॅपिंग, अनेक सरकारांवर झाले आहेत आरोप
'सर्व नागरिकांनी एकजूट होण्याची आवश्यकता'
केंद्र सरकारच्या या हुकूमशाही कारभाराला रोखण्यासाठी आता देशातील सर्व नागरिकांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी व संविधानाच्या सन्मानासाठी व्यापक लढा उभारण्याची वेळ आता आली आहे. यासाठी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने येथे आंदोलन करण्यात आले.असं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगतो यांनी सांगितलं.