पुणे - कोरोनाचे संकट टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास परवानगी नाही. त्यामुळे, घरातील बहुतांश सदस्यांचा एकत्र राहण्याचा कालावधी वाढला आहे. याच कालावधीत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत मात्र वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही काही दिवसांपूर्वी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे म्हंटले. पुण्यात मात्र कौटुंबिक हिंसाचार घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
हेही वाचा - पिंपरीत भाजप आमदाराचा कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून सैराट डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 28 मे या काळात केवळ 34 गुन्हे दाखल आहेत. या कालावधीत पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीचे 1 हजार 65 अर्ज प्राप्त झाले होते. यातील 147 अर्जांबाबत समझोता झाला आहे. 34 अर्ज न्यायालयात पाठवण्यात आले आहेत, तर 128 अर्जांवर चौकशी सुरू आहे.
महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक फटका
कौटुंबिक हिंसाचाराचा सर्वाधिक फटका हा महिला आणि लहान मुलांना बसतो. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, लॉकडाऊनच्या आधी महिला ऑफीसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी अथवा पालकांच्या घरी येऊ जाऊ शकत होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे प्रवासावर मर्यादा आल्यामुळे महिलावर्ग पूर्ण दिवस घरातच असल्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागते. या शिवाय घरात त्रास झालाच तर संचारबंदीमुळे घराबाहेर पडून पोलिसांत तक्रार देता येत नाही. ऑनलाईन तक्रार करायची ठरवले तर घरच्यांसमोर कशी करणार हा प्रश्न उभा राहतो. या व्यतिरिक्त पोलिसांत तक्रार केलीच तर कुटुंबाची नाहक बदनामी होईल, हा विचार करून काही महिला मुकपणे त्रास सहन करत असतात.
भरोसा सेल कक्षाकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक तक्रारी - शानमे
पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता शानमे म्हणाल्या, भरोसा सेल कक्षाकडे सध्या कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक तक्रारी येत आहे. यातील बहुतांश तक्रारी अर्जावर पती-पत्नीला समोरासमोर बसवून समुपदेशन करून वाद मिटवला जातो. परंतु, काही प्रकरणांमध्ये पती-पत्नीत टोकाचे वाद निर्माण झालेली असतात. पत्नीला त्रास सहन करावा लागत असल्यामुळे ती पतीसोबत राहण्यासाठी तयार नसते. अशावेळी गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नसतो. या शिवाय ज्या पती-पत्नींना वेगळे व्हायचे असते ते न्यायालयात जातात.
हेही वाचा - फार्म हाऊसवर डान्सपार्टी : पुण्यातील राजगड पोलिसांची कारवाई; तेरा जणांवर गुन्हा दाखल