पुणे - फरार असलेला कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांची राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी गंभीर दखल घेतली असून, कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्याच्या आतापर्यंतच्या गुन्हेगारी कृत्याचा आणि पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल देखील पाठवण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खुनाच्या दोन गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजानन मारणे याची 15 फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर गजाने मोठे शक्तीप्रदर्शन केले. चारचाकी गाड्या आणि शेकडो समर्थकांनी त्याची तळोजा कारागृहापासून मिरवणूक काढली. पुणे मुंबई महामार्गावरून हा ताफा बराच वेळ शक्तिप्रदर्शन करत पुढे जात होता. दरम्यान गजा मारणे याने अशाप्रकारे मिरवणूक काढल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात तळेगाव दाभाडे, हिंजवडी, कोथरूड, वारजे आणि खालापूर या पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले.
अजित पवारांकडून दखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याप्रकारणाची गंभीर दखल घेत भर कार्यक्रमात पोलिसांना खडे बोल सुनावले होते. गुंडांनी अशाप्रकारे मिरवणूक काढणे शहरासाठी शोभणीय नसल्याचे सांगितले होते. तसेच असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
फरार गजा मारणेचा पोलिसांकडून शोध
कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गजा मारणेसह त्याच्या 9 साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर गजा मारणे आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. वारजे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस गेले असता हा प्रकार उघडकीस आला. पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके गजा मारणेचा शोध घेत आहेत. ते ज्या ठिकाणी लपून बसले असण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी पोलिसांची छापेमारी सुरू आहे. सर्व संशयित आरोपींच्या घराच्या झडत्या घेण्यात येत आहेत. गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ताची माहितीही घेण्याचे कामही पोलीसांनी सुरू केले आहे.
मारणेविरोधात कारवाईच्या सूचना
दरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी खुद्द याप्रकरणाची दखल घेतली आहे. गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुणे पोलीस आता गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.