मुंबई - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धमकावून खंडणी मागणाऱ्या करुणा शर्मा यांची बहीण आरोपी रेणू शर्माच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात कथित ब्लॅकमेल आणि खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात रेणू शर्माने केलेल्या मानसिक छळामुळे धनजंय मुंडेंना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे मुंबई पोलिसांनी नमूद केले आहे. 13 एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रेणू शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण, मोबाईल फोन आणि रोख रकमेसह वस्तूंची यादीही सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेणू शर्माला इंदूरमधून केले होते अटक - रेणू शर्माला इंदूरमधून 20 एप्रिल रोजी अटक करण्यात आले होते. पोलिसांनी इंदूरच्या विकासकाचे जबाब देखील नोंदवले आहेत. रेणूने फेब्रुवारीमध्ये इंदूरमधील नेपेनिया रोडवरील बीसीएम पार्कमध्ये सुमारे 54.2 लाख रुपयांना डुप्लेक्स खरेदी केले होते. तिने खंडणीच्या पैशातून डुप्लेक्स खरेदी केल्याचा दावा करणारी कागदपत्रे जोडल्याची माहितीही पोलिसांनी यावेळी दिली. रेणूला हवालामार्फत 50 लाख रुपये आणि आयफोन दिल्याचे मुंडे यांनी सांगितले होते. धनंजय मुंडेंच्या वतीने इंदूरमध्ये रेणूला पैसे दिल्याचे दोन हवाला ऑपरेटर्सनी आपल्या जबाबात स्पष्ट केले होते.
5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप - रेणू शर्माने आपल्याकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. याविरोधात धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांमध्ये इंदूरला जाऊन रेणू शर्माला ताब्यात घेतले. रेणू शर्माच्याविरुद्ध यापूर्वीही ब्लॅकमेलिंगच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत.
काय आहे खंडणी प्रकरण - धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार रेणू शर्माने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेन, अशी धमकी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांना दिली होती. या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले होते. तसेच एक महागडा मोबाईलही पाठवला होता. मात्र, त्यानंतरही या रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपयांसाठी तगादा लावला होता.