बारामती (पुणे) - विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होणार. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीचे आणि आत्ताच्या विधानपरिषद निवडणुकीचे चित्र अगदी स्पष्ट आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीत व्यक्त केला. मुंडे काल बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा ( MLC Election 2022 ) आखाडा देखील रंगणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असून 20 जूनला ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीने आपली सर्व ताकद पणाला लावली. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. त्यामुळे, विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांनाही भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता. मात्र, शेवटच्या क्षणी सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे, ही निवडणूकही चुरशीची ठरणार आहे.
हे आहेत उमेदवार -
- भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
- प्रवीण दरेकर
- राम शिंदे
- श्रीकांत भारतीय
- उमा खापरे
- प्रसाद लाड
- महाविकास आघाडी
- चंद्रकांत हांडोरे ( काँग्रेस )
- अशोक उर्फ भाई जगताप ( काँग्रेस )
- रामराजे निंबाळकर ( राष्ट्रवादी )
- एकनाथ खडसे ( राष्ट्रवादी )
- आमश्या पाडवी ( शिवसेना )
- सचिन अहिर ( शिवसेना )
अपक्ष ठरणार 'गेम चेंजर' - राज्यसभेच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करत भाजपने सहावी जागा जिंकली. अशात आता विधान परिषदेच्या 10 व्या जागेसाठी भाजप किती फोडफाड करते हे पाहावे लागेल. त्यातच राज्यसभेच्या निवडणुकीत सोबत असलेल्या अपक्ष आमदारांवरच शिवसेनेने मतदान न केल्याचा संशय घेतला आहे. यावरून अपक्ष उमेदवार नाराज असून महाविकास आघाडीसोबत रहायचे की नाही, याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा दिला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष कोणती भूमिका घेणार याबाबतही चित्र स्पष्ट होणे बाकी आहे. यामुळे अपक्ष आमदाराच गेम चेंजर ठरतील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
काँग्रेसला आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास - महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्षाकडून प्रत्येकी दोन दोन उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपले दोन्ही उमेदवार जिंकून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे. मात्र, काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जवळपास दहा अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करावी लागेल. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची जुळवाजुळव महाविकास आघाडीने केली असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - ...यामुळे आमचा पाचवा उमेदवार निवडून देईल - देवेंद्र फडणवीस