पुणे - राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली सर्व मंदिरे आणि धार्मिक प्रार्थनास्थळे सोमवारपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पदाधिकारी आणि भाविकांनीही स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेऊन आम्हाला दिलेली दिवाळी भेट दिली असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिल्या आहेत.
ही तर श्रींची इच्छा-
दिवाळी पाडव्यापासून म्हणजे सोमवार पासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हा फक्त सरकारी आदेश नसून श्री ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरू झाल्याने राज्यातील मंदिरही सुरू करावीत, अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दगडूशेठ हलवाई मंदिराच्या भाविकांनी या निर्णयाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे.
कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च महिन्यापासून मंदिर आणि धार्मीक पार्थनास्थळांवर दर्शनास आणि प्रार्थनेस बंदी घालण्यात आली होती. अनलॉकमध्ये बंद देऊळ सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होतूी. त्यावरून राजकीय टीका टिप्पन्नीही झडल्या होत्या. एवढेच काय तर खुद्द राज्यपालांनी देखील या वादात उडी घेतली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारकडून त्यावेळी हा निर्णय टाळण्यात आला. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीसह मंदिरे उघडण्याची परवानगी ठाकरे सरकारकडून देण्यात आली आहे.
गेली आठ महिने कोणताही सण आला तरी उत्साह जाणवत नसे मात्र, आता सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे. तसेच सरकारने दिलेल्या सर्व नियमांचं मंदिर प्रशासन काटेकोर पणे पालन करणार आहे. भाविकांना विना मास्क मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्टीकरण यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील ससाणे यांनी दिले.