पुणे - शहरातील मार्केट यार्डात आंब्याची चांगली आवक झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातल्या घाऊक बाजारपेठेत दीड ते दोन हजार पेट्या देवगड हापूस आंब्याची आवक झाली आहे. असे असले तरी या हापुस आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
मार्केट यार्डात कच्च्या देवगड हापुसला ४ ते ७ डझनाच्या पेटीला ३ ते ६ हजार रुपये मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांना चढ्या दराने आंबा खरेदी करावा लागणार आहे. यंदा कोकणातुन दरवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के आंब्याची आवक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे कर्नाटक आणि केरळमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा पुण्यात येत असतो. मात्र, यावर्षी कर्नाटक व केरळमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे यंदा या भागातून फारशी आंब्याची आवक पुण्यात होणार नाही. त्यामुळे यंदा पुणेकरांना तुलनेने चढ्या दराने आंबा घ्यावा लागणार असल्याचे व्यापारी सांगतात.
हेही वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलर; देशात इंधनाचे दर 'जैसे थे'
पहिल्या पेटीला मिळाला २५ हजार रुपये भाव-
यंदाच्या हंगामात पुणे मार्केटमध्ये जानेवारीत हापूसची पहिली पेटी आली होती. तिला 25 हजार रुपये इतका भाव मिळाला होता. मात्र त्यानंतर आंब्याची आवक होण्यात मोठा खंड पडला. सध्या, मार्चच्या पहिल्या आठवडाखेर आंब्याची आवक झाली आहे. सध्या आंब्याला पुणे परिसर तसेच अहमदनगर जिल्ह्यातून मागणी आहे. कच्चा हापुसची आवक असून आठ दिवसानंतर तो खाण्यासाठी तयार होईल, अशी अपेक्षा असल्याची माहिती आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
हेही वाचा-नीता अंबानी यांनी खास महिलांकरिता लाँच केले 'हर सर्कल' डिजीटल माध्यम
आंब्याची राहणार कमी आवक-
दरम्यान, केरळ आणि कर्नाटकमध्ये वादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे आंब्यांच्या बागांची हानी झाली. त्यामुळे आवक कमी राहणार आहे. आंब्याचे भाव सध्या चढेच राहतील, असे चित्र सध्या आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना वाजवी भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा-टेस्लाची नवीन वेबसाईट लाँच; वापरकर्त्यांना करता येणार पोस्ट