पुणे - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुणे शहरात सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचसाठी प्रशासनाने 'स्मार्टसिटी वॉररूम' उभारली आहे. या पुणे स्मार्टसिटी वॉररूमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी डॅश बोर्ड प्रणालीची माहिती जाणून घेतली.
कोराना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा, असे सांगत या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पवारांनी यावेळी दिले. पुणे दौऱ्यावर असलेल्या पवारांनी कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना दिल्या. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्यासोबतच खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांना केले. बैठकीला उपस्थित असणाऱ्या लोक प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर पवार म्हणाले, खासगी हॉस्पिटलचे ८० टक्के खाट ताब्यात घेण्यात येणार आहेत. आपल्या सूचनांची प्रशासन निश्चित दखल घेईल. वेळोवेळी बैठका घेतल्या जातील. आपल्या सूचना वेळोवेळी पाठवा, असेही त्यांनी सांगितले.