पुणे - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोनासंसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुण्यातील विधानभवनाच्या सभागृहात पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - 'आपला निर्णय म्हणजे एक घाव दोन तुकडे, इथे तीन पक्षांचे सरकार' अजित पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण
कार्यवाही करण्याच्या सूचना
अजित पवार यांनी या बैठकीत कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांची तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिकांशी संपर्क व समन्वय
अजित पवार म्हणाले, की जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून चाचण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. गृह विलगीकरणातील नागरिकांशी संपर्क व समन्वय ठेवावा.
हेही वाचा - फडणवीसांचे तृतीयपंथीयासोबतच्या पोस्टप्रकरणी कारवाईचे अजित पवारांचे आदेश
दंडात्मक कारवाई
गृह विलगीकरणातील बाधित अनेकदा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशावेळी कठोर कारवाई करावी, तसेच गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी पथकांची नेमणूक करावी. कुठेही गर्दी होता कामा नये. मास्क न वापरणाऱ्यांवर वेळीच दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.
पुण्यासाठीचे नवे नियम
- पुण्यातील शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील
- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यातून सूट
- हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. तर होम डिलीव्हरी 11 वाजेपर्यंत करता येईल
- त्याचबरोबर एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्केच लोकांना परवनगी
- लग्न समारंभ, धार्मिक विधी, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांना परवानगी
- हे नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई
- पुण्यातील बागा फक्त सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद
- रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार नियंत्रण
- एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररीच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना वापरता येणार
- थिएटर, मॉल्स आणि दुकाने दहा वाजेपर्यंत सुरू राहतील.