पुणे - राज्यात शिंदे सरकार आल्यापासून सातत्याने शिवसेना आणि शिंदे सरकार यामध्ये संघर्ष पहिला मिळत आहे. दररोज आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे सारखे देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर काही काम करत नाही असा आरोप करत आहेत. त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही नेते आपला पूर्ण वेळ देत आहेत. तेआपलं काम करतात. आत्ता घरात बसून राज्य चालवायचे दिवस गेले. आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांवर उत्तर द्यायला मी मंत्री झालो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कितीवेळ मंत्रालयात आले आणि आदित्यही किती वेळा आले होते, असा सवाल केसरकर यांनी केला (Deepak Kesarkar criticized Uddhav Thackeray). दीपक केसरकर यांनी आज विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीनंतर सातत्याने बंडखोर गटाला सातत्याने 'गद्दार' असे संबोधन केले आहे. तर आदित्य ठाकरे यांनी आमदारांवर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. त्यावर दीपक केसरकर म्हणाले बंडखोर आमदारांनी शिवसेनेसाठी नाही, हिंदूत्वासाठी नाही तर आपल्या स्वार्थासाठी ते गेले आहेत. गद्दार बोलून चुकीच्या पद्धतीने तरुणांना गुंगीचे औषध देऊन काहीही होत नाही. तरुणांना फ्युचर देऊ शकत नाही. तरुणांना फ्युचर देण्याचे काम प्रत्येक राजकीय पक्षाचे आहे. जे तरुणांना फ्युचर देण्याचे काम करत नाहीत. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. भावनेवर राजकारण करण्याचे दिवस गेले. असेही यावेळी केसरकर म्हणाले.
वेगवेगळ्या पेपर मध्येटीईटी बाबत दोषीवर कारवाई कधी केली जाणार असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर केसरकर म्हणाले, कोणाला निर्दोष होईपर्यंत कामावर घेतले जाणार नाही. पण एक चुकीची प्रवृत्ती शिक्षणात आली तर शिक्षणाचा खेळ खंडोबा होईल. असे देखील यावेळी दीपक केसरकर म्हणाले.
शिक्षण विभागाची आढावा बैठक - महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ येथे आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.देवेंदर सिंह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला दिशा देण्यासाठी त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून तणावमुक्त शिक्षण दिले पाहिजे.
पायाभूत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी कृतीयुक्त शिक्षण द्यावे. व्यवसायाभिमुख, कौशल्याधिष्ठित, तांत्रिक शिक्षण देण्यावर भर द्यावा. शैक्षणिक प्रक्रीयेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण विभागाने सतत प्रयत्नशील रहावे. शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत बदल करावे, नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण द्यावे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर द्यावा, असेही केसरकर म्हणाले.
विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेवून वेळेत निकाल लावावेत. शासन आदेशांची अंमलबजावणी वेळेत करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.