पुणे - भरधाव पीएमपीएल बसने १५ वर्षीय सायकलस्वार मुलीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. शिवाजीनगर परिसरात दुपारी ही घटना घडली. चंदा सुरेश परिहार (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी चंदाचे वडील सुरेश परिहार (वय 36) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी चालक नंदकुमार महादू आनंदकर (वय 40) याला अटक केली आहे.
भरधाव बसने दिली धडक -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदाचे वडील सुरेश सुरक्षा रक्षक आहेत. चंदा हुशार आणि शांत स्वभावाची होती. शनिवारी दुपारी तिला भाजी आणण्यास पाठवले होते. ती सायकलने भाजी आणण्यास गेली होती. भाजी घेऊन डीएसके चौक ते मॉडेल कॉलनी या मार्गावरून येत होती. त्यावेळी चालक आनंदकर त्याच्या ताब्यातील पीएमपीएल बस भरधाव चालवत पाठीमागून आला आणि चंदा हिच्या सायकलला जोराची धडक दिली. यात चंदा खाली कोसळली.
तपासून डॉक्टरांनी केले मृत घोषित -
जखमी झालेल्या चंदाला नागरिकांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ शेळके यांनी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. यादरम्यान, रुग्णालयात नेलेल्या चंदा हिला तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे करत आहेत.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमधील मीरचंदानी पाम्स सोसायटीत आढळले 40 कोरोनाबाधित
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताची पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई; अवनी लेखराचा सुवर्णवेध...