पुणे - शहरात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर शहरात निर्बंध उठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. तसेच महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांमुळे शहरात ठिकठिकाणी खणून ठेवण्यात आलेल्या रस्त्यांमुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
हेही वाचा - पीक विम्याचे अपयश लपवण्यासाठी सरकार लोकांची दिशाभूल करते - देवेंद्र फडणवीस
- नागरिकांना कोरोनाच्या नियमांचा विसर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पुण्यासह राज्यतील इतर जिल्ह्यात पाहायला मिळाला. शहरात रुग्णसंख्या कमी झाल्याने जरी निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अजून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील नागरिक मात्र रस्त्यांवर गर्दी करत आहेत. अनेक रस्त्यांवर तर नागरिक सर्रास विनामस्क फिरत आहेत. महापालिकेच्यावतीने 10 जूनपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानंतर शहरातील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.
- ठिकठिकाणी पावसाळीपूर्व काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी
पुणे शहरात ठिकठिकाणी पावसाळीपूर्व कामे सुरू आहेत. शहरातील पेठांमध्ये तर मोठंमोठे रस्ते खणून काम केले जात आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने महापालिकेच्यावतीने निर्बंध उठवल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात या वाहतूक कोंडीमुळे गर्दी होत आहे. पावसाळीपूर्व कामे हे 31 मे पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. पण मागील एक वर्षांपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे हे कामे पूर्ण करायला उशीर झाला आहे.
हेही वाचा - पाचाड गावात 6 जूनपर्यंत कडक जनता कर्फ्यू; शिवराज्याभिषेकासाठी गर्दी करू नये ग्रामपंचायतीचे आवाहन