पुणे- येथील गणेशोत्सवातील इतिहासात पहिल्यांदाच कैद्यांच्या ढोल-ताशा पथकाचे वादन होणार आहे. मानाचा तिसरा, गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या रथापुढे यंदा येरवडा कारागृहातील 30 कैद्यांचे ढोल-ताशा पथक वादन करणार असून गणेश चरणी आपली सेवा अर्पण करणार आहे. यासाठी मागील 25 दिवसांपासून या पथकातील कैद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते.
गणेशोत्सव प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी ढोल-ताशांची अनेक पथके सहभागी होतात. या सर्व पथकांचा महिनाभर आधीच सराव चालतो. या पथकात सहभागी होण्यासाठी तरुण तरुणी अक्षरशः जीवाचा आटापिटा करत असतात. मात्र यावर्षी प्रथमच कैद्यांचे ढोल पथक सहभागी होणार आहे. कारागृह विभागाचे प्रमुख सुनील रामानंद यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नादब्रम्ह ढोल ताशा पथकाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना कैद्यांना वादनाचे प्रशिक्षण देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या पथकाच्या कार्यकर्त्यांनी मागील 25 दिवसांपासून कारागृहामध्ये या कैद्यांना प्रशिक्षण दिले. कैद्यांच्या या पथकामध्ये 30 कैदी बांधवांचा समावेश असून त्यामधील दोघेजण ताशा वादन करत आहेत.