पुणे - कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. गजा मारणे आणि त्याच्या आयटी टीमने सोशल मीडियावर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय त्याच्या फोटो आणि व्हिडिओवर लाइक, कमेंट करणाऱ्यांविरोधातही बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारीतून काढली होती मिरवणूक
तुरुंगातून सुटल्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात हा सहावा गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजानन मारणे आणि समर्थकांनी मोटारीतून मिरवणूक काढली होती. त्यानंतर त्यांनी विरोधी टोळीसह जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केले. गजानन मारणेविरूद्ध आणखी 6 गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.
भीती निर्माण होण्याची शक्यता
सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे संबंधित केसमधील साक्षीदार आणि तक्रारदारांच्या मनात भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. मारणेसह समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे अनेकांनी गुन्हेगारी स्वरूपाचे मत व प्रतिक्रिया दिल्या आहेत. संबंधित व्हिडिओला यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाइक, कमेंट करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची मोहीम
गुन्हेगारी प्रवृत्तीचे सोशल मीडियावर उदात्तीकरण करणाऱ्यांविरूद्ध पुणे पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार संबंधितांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्हिडिओला कमेंट करण्यापूर्वी विचार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.