पुणे - शहरात गुन्ह्यांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे. 2021 मधील पहिल्या सहा महिन्यातच पुण्यात हत्येच्या प्रयत्नाचे तब्बल 139 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 95 ने वाढला आहे. तर या सहा महिन्यात हत्येची 38 प्रकरणं उघडकीस आली आहेत. पूर्वीपर्यंत पुण्यातील गुन्हेगारांना 'पुणेरी भामटे' ही संज्ञा वापरली जात होती. मात्र, आता भामटेगिरी सोडून भाईगिरी करण्याकडे पुण्याचे गुन्हेगारी वर्तुळ वळले असून त्यामुळे शहरात गँगवॉर वाढले आहे.
- या घटनेमुळे गँगवॉरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर -
गुरुवारी पूर्वीच्या वादातून उरळीकांचन येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने दुपारच्या सुमारास गोळीबार केला. भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत संतोष जगताप याचा मृत्यू झाला असून, बचावासाठी केलेल्या गोळीबारात टोळक्यातील एका हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे गँगवॉरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
- 2021 मध्ये गुन्हेगारी वाढली -
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांची चिंताही वाढवणारी आहे. जानेवारी ते जून 2021 या कालावधीत पुण्यात हत्येच्या प्रयत्नाचे एकूण 139 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात हा आकडा 44 इतकाच होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या तब्बल 95 ने वाढली आहे. तर यावर्षी पहिल्या सहा महिन्यात 38 जणांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे, गेल्या वर्षी हा आकडा 36 इतका होता.
हेही वाचा - CCTV FOOTAGE - कांदे बटाटे व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले
- टोळ्यांमुळे पोलिसांना डोकेदुखी -
संघटित गुन्हेगारीचा मागोवा पुणे पोलीस घेत असल्यामुळे हत्येच्या प्रयत्नाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे नोंदवले जात आहेत. गुन्हेगारांच्या जवळपास 30 टोळ्यांचा पर्दाफाश केल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. पूर्ववैमनस्यातून भिडणाऱ्या टोळ्यांमुळे यंदा मे महिन्याच्या अखेरपर्यंत 530 गुन्ह्यांची नोंद पुण्यात झाली होती. गेल्या वर्षा हाच आकडा 410 इतका होता.
- पुण्याच्या कोणत्या भागात टोळीयुद्ध?
पुण्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरातही गुन्हेगारी टोळ्या वाढताना दिसत आहेत. एकमेकांकडे बघितल्याच्या रागातून किंवा जाहीर अपमान केल्याच्या भावनेतून हत्येच्या प्रयत्नाच्या केसेस वाढत असल्याचं क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. टोळीयुद्धांमुळे गुन्हेगारी वाढल्याकडेही पोलिसांनी लक्ष वेधलं. बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, भवानी पेठ, येरवडा, वानवडी, सिंहगड रोड या भागात दोन गटांमधील वादाच्या तक्रारी अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
- 12 महिन्यात मोका'अंतर्गत 50 कारवाई केल्या आहेत -
टोळीविरुद्ध पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या 12 महिन्यांच्या कारकीर्दीत 'मोका'अंतर्गत झालेली ही 50 वी कारवाई आहे.
- वर्षात 50 टोळ्यांवर मोक्का -
गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान पुण्यातल्या 7 टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली, तर टोळ्यातल्या 54 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. यावर्षी जानेवारीपासून तब्बल 43 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. यामध्ये 303 आरोपी अटक आहेत. नीलेश घायवळ टोळी, सराईत सोनसाखळी चोर राजाभाऊ राठोड टोळी, सूर्यकांत उर्फ बंडु आंदेकर टोळी, बिरजूसिंग दुधानी टोळी, सचिन पोटो टोळी, शुभम कामटे टोळी, अली अकबर इराणी टोळी, मतीन सय्यद टोळी, बंटी पवार टोळी, विवेक यादव टोळी अशा काही मोठ्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - बनावट वेबसाइटच्या माध्यमातून तुळजाभवानीच्या भाविकांची फसवणूक