पुणे - शहरातील एका प्रसिध्द हॉटेलमध्ये कोरोना बाधित रुग्ण उतरल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना संबंधीत व्यक्तीने फोनद्वारे दिली होती. त्यानुसार पडताळणी केली असता, ही माहिती खोटी असल्याचे उघड झाले. यानंतर स्वतः म्हैसेकर यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानुसार एका अनोळखी मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी पुण्यात प्रथमच असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा... पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला, बाधितांची संख्या १६ वर
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात रविवारी आणखी एका रुग्णाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ वर पोहोचली. तर, राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ झाली आहे.
कोरोना व्हायरसबाबत तसेच रुग्णांबाबत सोशल मीडियातून खोटी माहिती, अफवा पसरवली जात आहे. त्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. आरोग्य विभागामार्फत यासंबंधी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून सोशल मीडियावर कोरोनासंबंधी फिरणारे खोटे संदेश, अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.