पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर आता व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र, पारंपरिक व्यवसाय असलेल्यांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. यातील एक पारंपरिक व्यवसाय म्हणजे लोहार. पुण्यातील उत्तमनगर येथे 7 पिढ्यांपासून काम करणाऱ्या विठ्ठल पवार यांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.
- लॉकडाऊननंतरही काम नाही -
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. त्यात लोहार हा शेती व्यवसायाशी निगडित व्यवसाय आहे. आता शेतकऱ्यांची पेरणी झाली असून, त्यानंतर निर्बंध शिथिल झाल्याने जी कामे शेतीविषयी येत होती ती कामे आता येत नाही. तसेच शेती मशागतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. त्यामुळे लोहार व्यवसाय कोरोनासंकट आणि लॉकडाऊनमुळे पूर्णपणे डबघाईला आला आहे. मागील वर्षीचा पावसाळी हंगाम लोहार व्यवसाय करण्यास आला नव्हता, तर याहीवर्षी पावसाळी हंगामावेळी लॉकडाऊन असल्याने या लोहार व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. लोहार समाजाची अनेक कुटुंब वडिलोपार्जित लोहार व्यवसाय करतात. या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा संपूर्ण खर्च हा लोहार व्यवसायावर अवलंबून असतो.
- आता तर काहीच मदत नाही -
कोरोनाच्या सुरुवातीला सरकारकडून धान्यरूपी मदत मिळत होती. तसेच इतर संस्था, संघटनांच्यावतीने देखील मदत होत होती. मात्र, आता तर दुसऱ्या लाटेत कोणीही काहीच मदत केली नाही. या लॉकडाऊनमध्ये तर मोठ्या आर्थिक संकटाबरोबर हलाकीच्या परिस्थितीतून जावं लागलं, अशी माहिती यावेळी विठ्ठल पवार यांनी दिली.
- सध्या दिवसाला फक्त 100 ते 200 रुपयेच मिळतात -
लॉकडाऊनच्या आधी शेती विषयक अवजारे बनवत होतो. लॉकडाऊनच्या आधी अवजारे तयार करून दिवसाला 400 ते 500 रुपये मिळत होते. पण आता तर तेही मिळत नाही. आता एखाद्या दिवशी 100 तर कधीकधी तर काहीच पैसे मिळत नाही. मागील वर्षी देखील व्यवसाय कधी बंद तर कधी सुरू असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोना महामारीच्या या संकटात अनेकांचे उद्योग, व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता बारा बलुतेदारांच्या व्यवसायांनाही मोठा फटका बसल्याने मायबाप सरकारने या व्यवसायांना हातभार लावण्याची गरज आहे.