पुणे - कोरोनाच्या धास्तीमुळे एप्रिल, मे, जून या आगामी तीन महिन्यातील 90 टक्के पर्यटकांनी आपली सहल रद्द केली आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला 150 कोटींचा फटका बसला आहे. पुण्यातून दरवर्षी 25 ते 30 हजार पर्यटक प्रवास करतात. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे यातील 90 टक्के पर्यटकांनी आपली सहल रद्द केली आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ डोमेस्टिक टूर ऑपरेटर ऑफ इंडियातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जगभरातील विविध क्षेत्रांवर कोरोना विषाणू संसर्गाचा परिणाम होत आहे. पर्यटन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. पर्यटकांनी पर्यटन कंपन्या आणि विमान कंपन्यांकडे आमच्या सहली रद्द करा, असा तगादा लावला आहे. कोरोनाबाबतची सद्यस्थिती काय आहे, याचा खुलासा केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने आणि आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी झाल्याचे समोर आले आहे, तेथे आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. असे असतानाही पर्यटकांच्या मागणीमुळे देशांतर्गत आणि देशाबाहेरील सहली रद्द कराव्या लागत आहेत.
पर्यटकांनी घाबरून न जाता भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या ट्रॅव्हल ऍडव्हायझरीचा अभ्यास करून शक्य असेल तर देशांतर्गत पर्यटन करण्यास प्राधान्य द्यावे. कोरोना व्हायरसची धास्ती वाटणाऱ्या पर्यटकांनी एप्रिल, मे, जून या महिन्यातील सहली घाई-गडबडीत रद्द करू नये. परिस्थितीचा आढावा घेऊन खात्री करून कालांतराने योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
हेही वाचा - कच्च्या तेलाचे दर कोसळले, ग्राहकांना थेट फायदा मिळणे केंद्र सरकारच्या इच्छेवर अवलंबून - लोध
हेही वाचा - कोरोना विषाणूची धास्ती, विदेशी टूर रद्द करण्यासाठी महापौर ऑपरेटरांना देणार पत्र