पुणे - हर्षवर्धन पाटील काय म्हणाले माहिती नाही. पण त्यांचा म्हणण्याचा उद्दिष्ट हा होता की भाजपमध्ये किटकिट नाही. कोणीही काहीही प्रेशर निर्माण करत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सारखं प्रेशर असतं. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते नेहमीच दबावात असतात. पण तरीही आयुष्य चालवायचं असतं पर्याय सापडेपर्यंत. पर्याय सापडला तर पटापट बाहेर पडले. सरकार जर पुढेही असतं तर काहीच ठेवलं नसतं रिकामं झालं असतं सगळं, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनच्यावतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लहान मुली तसेच तृतीयपंथीयांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
किरीट सोमैया जीवावर उदार होऊन भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत -
या सरकारकडून तोंड वर करून सांगितलं जातं आहे की ईडी, सीबीआय यांचा गैरवापर सुरू आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात दुरुपयोग झाला आहे. 18 वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. जे चाललं आहे त्या विषयात चौकशीला सामोरे न जाता दबाव निर्माण केला जात आहे. किरीट सोमैया जीवावर उदार होऊन भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कधी न होती अशी भीषण परिस्थिती राज्यात निर्माण झाली -
महिला सुरक्षेविषयी गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. जी स्थिती या राज्याची होती की रात्री 1 वाजताही महिला एकटी कुठेही जायची, ती स्थिती आता राहिलेली नाही. आता 7 वाजताही महिलांना बाहेर पडताना विचार करावा लागतो अशी भयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. आमच्या काळात कुठलीही घटना घडत असताना निलम ताई, वंदना ताई, सुप्रिया सुळे रस्त्यावर यायच्या, आता कुठे आहेत या महिला? कधी न होती अशी भीषण परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.
हेही वाचा - आर्यनला 'जेल की बेल' उद्या कळणार; काय झालं न्यायालयात?