पुणे - स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत? बाजार समित्यांच्या मक्तेदारीसाठी तुम्ही का आग्रही आहात? शेतकरी स्वतंत्र व्हावा, असे तुम्हाला वाटत नाही का? बाजार समित्यांचा कायदा मागे घेऊ, असे आश्वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले नव्हते का? हरियाणात काँग्रेस सत्तेत असतानाच 2007 मध्ये कंत्राटी शेती सुरू झाली नव्हती का? या पाच प्रश्नांची उत्तरे काँग्रेस नेतृत्वाने द्यावी, असे आव्हान भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले.
काँग्रेसपक्षाला आपला जाहीरनामा व आपल्या काळात दिलेल्या परवानग्या सुध्दा आठवत नाहीत हे दुदैवी आहे. काँग्रेसची हरियाणात सत्ता असताना २००७ मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात शेतमाल विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोधक विरोध करीत आहेत, असे उपाध्ये यावेळी म्हणाले.
उपाध्ये पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या ४ वर्षांत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ७७ हजार कोटींची भरपाई मिळाली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने या ३ विधेयकाच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आले आहेत.