पुणे - हडपसर परिसरातील एका लसीकरण केंद्रामध्ये चोरट्यांनी दरोडा टाकला. लसीकरणाच्या नोंदीसाठी ठेवण्यात आलेला संगणक चोरट्यांनी पळून नेला आहे. याप्रकरणी प्रशांत कुंजीर (वय 39) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपस मधील माळवाडी परिसरात विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह आहे. या नाट्यगृहात महापालिकेचे लसीकरण केंद्र सुरू आहे. रात्रीच्या सुमारास हे लसीकरण केंद्र बंद असताना अज्ञात चोरट्यांनी लसीकरण केंद्राच्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लसीकरणाच्या नोंदीसाठी ठेवलेला संगणक घेऊन पसार झाले.
हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. कोरोना लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद असल्याचा फायदा उचलून चोरट्यांनी कर्वेनगर परिसरातील एका शाळेत असणाऱ्या लसीकरण केंद्रात प्रवेश करून चोरी केली होती. या ठिकाणाहून ही चोरट्यांनी संगणक आणि इतर साहित्य असा 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
हेही वाचा - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालवली तीन चाकी ई-रिक्षा, सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ