पुणे - देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरुद्ध अॅड. पुष्कराज परदेशी यांनी खेड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे वेगळ्या कारणासाठी घेतलेले शपथ पत्र सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी वापरण्यात आल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार या दोघांनी बहुमत असल्याचे सांगत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यावेळी आमदारांचे शपथपत्र राज्यपालांना देण्यात आले होते. मात्र, सत्ता स्थापन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याचे शपथपत्र दुसऱ्या कारणासाठी घेतले होते. असे असतानाही हे शपथपत्र पाठिंब्याच्या रूपाने दाखवण्यात आली आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर असून हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी करून जनतेची, लोकशाहीची, शासनाच्या राज्यघटनेची फसवणूक करुन मंत्रीपद प्राप्त केले. त्यामुळे या दोघांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड. पुष्कराज परदेशी यांनी आज खेड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करून केली आहे.