पुणे - जमिनीच्या वादातून पत्नीने केलेला शारीरिक आणि मानसिक छळ तसेच मेहुण्याने वारंवार पैसे घेऊन आणलेला कर्जबाजारीपणा अशा प्रकारे सासरच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना ११ जून २०१६ साली घडली होती. सुनील महादेव नवले (५५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपींविरोधात वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शिवाजीनगर न्यायालयाने वाकड पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सुमन महादेव नवले (५५, पिंपरी-चिंचवड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिवांजली सुनील नवले (२३), महादेवी रामदास चौरे (४५), सत्यवान रामदास चौरे (२४), आणि शिवरत्न रामदास चौरे (२३) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यांनी त्यांच्या नावावर जमीन खरेदी केली होती. ती जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी सुनील यांची पत्नी शिवांजलीने मृत सुनील यांना वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. तसेच पत्नीने इतर पुरुषांसोबत सपर्क सुरू ठेवला. पत्नी पतीचे ऐकून घेत नव्हती. मेहुणा सत्यवान आणि शिवरत्न या दोघांनी सुनील यांच्याकडून वारंवार पैसे घेतले. त्यामुळे सुनील कर्जबाजारी झाले. त्यासाठी सुनील यांच्या सासूने त्या दोघांना मदत केली. या त्रासाला कंटाळून सुनील यांनी ११ जून २०१६ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली.
सर्व प्रकारानंतर सुनील यांची बहिण सुमन यांनी शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली होती. शिवाजीनगर न्यायालयाच्या आदेशानंतर वाकड पोलीस ठाण्यात पत्नीसह मेहुण्यांवर आणि इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.