पुणे - जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत सुधारणा होत असून त्याच पद्धतीने लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठं आणि पर्यटन स्थळे सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होतो. यावेळी त्यांनी हा निर्यण घेतला. या बैठकीस खासदार गिरीश बापट, महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरव राव आदी उपस्थित होते.
बाहेरील विद्यार्थ्यांना आरटी-पीसीआर बंधनकारक -
जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविड संसर्गाचा प्रमाण नियंत्रणात असल्याने येत्या सोमवारपासून महाविद्यालये सुरू करण्यात यावीत. लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय परिसरात प्रवेश देण्यात यावे. महाविद्यालय व्यवस्थापनाने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे, असे देखील यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
सोमवारपासून हॉटेल्स रात्री 11 पर्यंत सुरू -
जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद असल्याने लहान व्यावसायिकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने पर्यटन स्थळे देखील सोमवारपासून सुरू करण्यात यावे तसेच पर्यटकांना मास्क घालणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच येत्या सोमवारपासून शासकीय कार्यालया प्रमाणेच खाजगी कार्यालय देखील शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्यास आणि हॉटेल्स रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्रशिक्षण केंद्रे देखील सुरू करण्यात येणार आहे.
झोपडपट्टी भागात लसीकरणासाठी विशेष मोहीम -
कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून ही चांगली बाब आहे. मात्र येणार्या सण उत्सवाच्या कालावधीत लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागात लसीकरणाची विशेष मोहीम घेण्यात घेण्यात याव्या. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात याव्या अश्या सूचना करण्यात देखील आले आहे, असे पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा - नियमाने जे काही असेल ते जनतेसमोर येईल... घाबरायचे काहीही कारण नाही - अजित पवार