पुणे - महायुतीच्या सरकारने पुण्याच्या विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याचा केवळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून विचार केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते मोठे झाले. मात्र पुणे लहान झाले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. देशात, राज्यात, महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर पुण्याचा चेहरामोहरा बदलला, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मेट्रो, फ्लायओव्हर, रिंगरोड, स्वारगेट डेपो, विमानतळ, योजनेतून दिलेली दीड लाख घरे अशी कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर मुख्यमंत्र्यांची टीका-मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. ही भयानक गोष्ट आहे. असे झाल्यास दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे, की जैश -ए -मोहम्मदचा जाहीरनामा आहे, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसकडे देशाचा विकास आणि संरक्षणासाठी कोणतेही ठोस धोरण नसल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. काश्मीरमधील सैनिक कमी करू असे काँग्रेसने जाहिरनाम्यात आश्वासन दिले आहे. यामुळे दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचा सैनिकांना अधिकारही काँग्रेस काढून घेणार असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.