पुणे - राज्यभरात आजपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. मार्च महिन्यापासून राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृह बंद होती. मागील दीड-दोन महिन्यांपासून सरकारने राज्यभरातील वेगवेगळ्या संस्था अनलॉक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चित्रपटगृह आणि नाट्यगृह कधी अनलॉक होतील याची प्रतीक्षा सर्वांना होती. अखेर आजपासून नाट्य आणि चित्रपटगृह देखील अनलॉक झाले आहेत. त्यानंतर आता नव्या नाटक आणि चित्रपटांची प्रतीक्षा रसिकांना लागली आहे.
मार्च महिन्यापासून बंद होती रंगमंदिरं -
गेले सात ते आठ महिने हा व्यवसाय बंद असल्याने यावर अवलंबून असलेले कलाकार, तंत्रज्ञ ,बॅकस्टेज कलाकार यांची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे सातत्याने या संस्था सुरू करण्याची मागणी कलाकारांकडून होत होती. लॉकडाऊनच्या काळात कलाकारांची मोठी बिकट अवस्था झाल्याचे देखील बघायला मिळाले. आज ही चित्रपट, नाट्यगृहे सुरू झाल्याने कलाकारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. याचबाबत आनंद व्यक्त करण्यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, नाट्य भूमीवरील कलाकार तसेच तंत्रज्ञान, बॅकस्टेज कलाकार यांनी एकत्र येत रंगमंचाचे पूजन केले.
सध्या 50 टक्के क्षमतेने चित्रपट, नाट्यगृह सुरू -
हेही वाचा - 'मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोराला सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे...'
सध्या 50 टक्के क्षमतेने ही चित्रपट, नाट्यगृह सुरू राहणार आहेत. मात्र, असे असले तरी हा व्यवसाय पुन्हा सुरू होत आहे याचा आनंद मोठा असल्याचे कलाकार सांगतात. तसेच 50 टक्के क्षमतेने हा व्यवसाय सुरू करायचा असल्याने नाट्यगृहावरील असलेल्या करांचा भारदेखील 50 टक्क्यांनी कमी करावा. तसेच वृत्तपत्रांनी देखील नाट्यसंबंधी जाहिरातींचा दर 50 टक्क्यांनी कमी ठेवावा, अशी अपेक्षा या कलाकारांनी व्यक्त केली.
हेही वाचा - 'यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही'
रसिक प्रेक्षकांना पुन्हा नाट्य भूमीकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून काही दिवस फुकट कला सादर करायचा मानस देखील या कलाकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकंदरीतच इतक्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर कला सादर करण्यासाठी हे कलाकार आसुसलेले आहेत. कधी एकदा प्रेक्षक या रंगमंदिरात येतात याची वाट ते पाहत असून, त्यासाठी त्यांनी प्रेक्षकांना आवाहन देखील केले आहे.