पुणे : पुण्यातल्या भोरमधील रायरेश्वर पठरावर राहणाऱ्या एका बाळंतीण महिलेला, तिच्या पठरावरील घरी नेतानाचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. पठारावर जाण्यासाठी सोयीचा दुसरा मार्ग नसल्यानं 4500 फूट उंच असणाऱ्या पठरावर, डालाची झोळी करून लोखंडी शिडीवरून धोकादायक पद्धतीने न्यावं लागत ( carried dangerously from iron ladder ) असल्याचा हा व्हिडिओ आहे. योगिता विक्रम जंगम असं या बाळंतीण महिलेच नाव आहे. 5 दिवसांपूर्वी या महिलेची प्रसूती झाली ( woman had given birth ) होती. जाण्या-येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने या ठिकाणच्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून अशीच कसरत करावी लागती आहे.
धोकादायक पद्धतीने करावा लागतो प्रवास : दुर्गम भागात रायरेश्वर किल्ल्याजवळ असणाऱ्या या 6 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या पठरावर शेकडो वर्षांपासून जवळपास 50 कुटुंबांचे वास्तव्य आहे. मात्र अद्यापही त्यांना जाण्या- येण्यासाठी धोकादायक पद्धतीने या शिडीचा वापर करावा लागतो आहे. कोणी आजारी पडलं अथवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांना अशाच प्रकारची कसरत करत, धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतो. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पठारावरील कुटुंबांसाठी आणि पर्यटन विकासासाठी रोप-वे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.