पुणे - मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका, सारथी संस्थेचे प्रश्न आणि मराठा समाजातील प्रलंबित प्रश्नांबाबत सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुणे येथे आले असता प्रश्न विचारले असता, त्यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण टिकले पाहिजे, मिळाले पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, या मताचा मी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
सारथी आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया...
राज्यात सारथीवरून जे काही राजकारण सुरू आहे त्याची काय मला कल्पना नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि ते टिकले पाहिजे या मताचा मी आहे. वडेट्टीवार ओबीसी आहेत म्हणून त्यांना लक्ष करणे अयोग्य आहे. मात्र, संस्थेचे काही नियम असतील तर त्यानूसार ते काम करत असतील. मंत्री हा काही एखाद्या घटकाचा नसतो. ते अयोग्य काम करत नसतील, असे माझे मत आहे. मात्र, मंत्र्यांचे काम चूकत असेल तर चूक दाखवा, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - सारथी..! मराठा समाजातील प्रतिनिधी सोबतच्या बैठकीचा पहिला टप्पा पूर्ण
कोरोनाचे आकडे लपवले जातात हा देवेंद्र फडणवीसांचा आरोप वास्तवतेला धरुन नाही : छगन भूजबळ
मालेगावात कोरोना रुग्णांच्या बळींचे आकडे लपवले जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, त्यांनी केलेला आरोप हा वास्तवतेला धरून नाही आणि त्याला काही अर्थही नाही. मालेगावातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आता तिथे कसलाही प्रादुर्भाव नसून मालेगावात बळींचे आकडे लपवले जात नाहीत, असे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवारांच्या त्या मुलाखतीची मलाही उत्सुकता...
संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीची राज्याला आणि देशाला उत्सुकता आहे. त्यातच जो प्रोमो आलाय, एक शरद सगळे गारद हे शरद पवारांना अतिशय समर्पक आहे. कारण शरद पवारांनी अनेकांना गारद केले आहे. त्यामूळे या मुलाखतीची मलाही उत्सुकता असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.