पुणे - महायुतीचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून रॅलीला सुरुवात झाली.
सकाळीच कोथरूडचे ग्रामदैवता म्हातोबा मंदिरात जाऊन पाटील यांनी दर्शन घेतले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. यावेळी त्यांनी अबकी बार 220 के पार म्हणत युतीचंच सरकार सत्तेत येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खडसेंबाबत बोलणे टाळले -
यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी, दोन दिवस कोथरूडमध्येच आहे. त्यामुळे कुणाला जागा दिल्या नाहीत ते माहिती नाही, माहिती घेऊन बोलतो, असे म्हणत चंद्रकांत पाटील खडसे यांच्या उमेदवारीवर बोलण्याचे टाळले.
मी पुण्याचा जावई आहे. पुण्याचे अनेक प्रश्न मी सोडवले. मुंबईबरोबर पुणे वाढत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर, चंद्रकांत मोकाटे यांची समजूत घालताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. तुम्ही मला सहकार्य करा, असे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर मोकाटे पाटील यांच्या रॅलीत सहभागी झाले.