पुणे - पूजा चव्हाणची आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे न्याय देणार का, अशा प्रश्नावर नेहमीच न्याय भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महिलांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक मंत्री गुंतले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. मात्र पोलीस का चौकशी करत नाहीत, मुलीचे आई-वडील तक्रार देत नसतील तर सुमोटो केस दाखल केली पाहिजे, असे पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
चंद्रकात पाटील म्हणाले, की सरकारची प्रतिमा डागाळत चालली आहे, काहीही करा, काही होत नाही, असे या सरकारच्या काळात झाले आहे. एक मंत्री 15 वर्षे एका महिलेसोबत राहतो. महिलेची तक्रार असूनही कारवाई होत नाही. एक मंत्री कार्यालयात बोलवून मारहाण करतो, या सरकारमध्ये चाललंय काय, अशी टीका पाटील यांनी केली.
पूजा चव्हाणच्या निमित्ताने हे सर्व प्रश्न ऐरणीवर आले आहेत. पूर्ण महाराष्ट असुरक्षित झाला आहे. सत्तेसाठी काहीही करणार असे झाले आहे. ज्यांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालते, त्या शरद पवारांनी यात लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पॉवरचा उपयोग करून चौकशी केली पाहिजे. त्यात मंत्री गुंतल्याचे बोलले जाते त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्या मुलीच्या पाळतीवर ठेवलेल्या 2 जणांना अटक का झाली नाही, त्यांना का सोडून दिले. मुलीचा लॅपटॉप जप्त केला पाहिजे त्याची तपासणी केली पाहिजे पोलीस गेल्या काही महिन्यात दबावाखाली असल्याचे दिसून येतंय, असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या सीडी काढतो वक्तव्यावर बोलताना गेल्या 14 पंधरा महिन्यात अनेकांनी धमक्या दिल्या. आम्ही म्हणतो काढा सिड्या कोण आहे दोषी ते कळू द्या, आम्ही घाबरत नाही, असे पाटील म्हणाले