पुणे - रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा हिंदुत्ववाद (Hindutva) आणि युतीवरून भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने हिंदुत्ववाद (Shivsena Hindutva) सोडला नाही हे तुम्ही काँग्रेसला (Congress) ठणकावून सांगितले पाहिजे. तसेच राहायचे असेल तर राहा नाहीतर सोडून द्या असेही सेनेने काँग्रेसला सांगितले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
- युतीत राहून भाजपचे नुकसान -
युतीत राहून नुकसान हे भाजपचेच झाले आहे. युती तुटल्यानंतर 2014 ला आम्हाला 122 जागा मिळाल्या. त्यानंतर युती केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला कमी जागा मिळाल्या आहेत. भाजपबरोबर युती केल्यामुळेच शिवसेना आज एवढी मोठी झाली आहे. युती सोडायची भाषा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे, अशी टीकाही यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
- गोव्यात भाजप 22 जागा जिंकेल -
गोव्यात होत असलेल्या निवडणुकीबाबत सातत्याने शिवसेना खासदार संजय राऊत भाजपवर टीका करत आहेत. त्यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेला गोव्यात मागच्या वेळच्या निवडणुकीत 743 मते मिळाली होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन काय फरक पडणार आहे. गोव्यात भाजप 22 च्या खाली जागा घेणार नाही, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
- पटोले यांच्या शारिरीक आणि मानसिकतेवर काहीतरी प्रॉब्लेम झाला-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा राज्यातील राजकारण हे तापलं असून, आज राज्यभर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील नाना पटोले यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, नाना पटोले यांना आता काँग्रेसने अंडरऑबझरवेशनमध्ये ठेवायला पाहिजे. त्यांची शारिरीक आणि मानसिक तपासणी करावी लागेल की नेमकं यातील मानसशास्त्र काय? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. यांना म्हणायचं काय आहे, यांचा नेमका हेतू काय? त्यांच्या शरीरात काही प्रॉब्लेम झाला आहे का की अशा पद्धतीने देशाच्या सर्वोच्च नेत्याबाबत असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे, अशी टीका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.