पुणे - पुण्यातील सोफोश ही संस्था मागील 57 वर्षापासून ससून रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना मदत करत असते. या संस्थेच्या माध्यमातून श्रीवत्स आणि तारा सोफोश या दोन संस्था निराधार आणि निराश्रित बालकांसाठी काम करतात. यातील श्रीवत्स संस्थेमध्ये 38 तर तारा सोफोष संस्थेमध्ये 43 बालके आहेत. यामध्ये एक दिवसाच्या बाळापासून ते 6 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. या संस्थेत दाखल होणारी सर्व बालके बालकल्याण समितीच्या आदेशाने दाखल होतात.
बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष
मार्च 2020 पासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. संस्थेतील 115 महिला कर्मचाऱ्यांवर बालकांच्या संगोपनाची जबाबदारी आहे. या महिला कर्मचारी 15-15 दिवस या मुलांसोबत राहून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडीत आहेत. या कर्मचाऱ्यांना घरची जबाबदारी असताना, घरात मुलं असताना त्याचा विचार न करता याठिकाणी राहून त्या येथील निराधार मुलांचे संगोपन करत असतात.
व्हिडिओकॉलद्वारे प्रत्येक मुलाशी चर्चा
याविषयी अधिक माहिती देताना संस्थेच्या पदाधिकारी शर्मिला सय्यद म्हणाल्या, संस्थेमार्फत कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातात. या महिलांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाते. कोरोनाचा काळात सतत चार भिंतीच्या आत राहून मुलांचेही मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता असते. म्हणून व्हिडिओकॉलद्वारे प्रत्येक मुलाशी चर्चा केली जाते. येथील मुलांच्या शिक्षणासाठी 24 तास शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड काळात शासनाने जे काही नियम घालून दिले आहेत त्याची या संस्थेत कडक अंमलबजावणी होते. वारंवार हात धुणे, सॅनिटाईझ करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे यासारख्या नियमांचे पालन केले जाते. त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याची देखील पाहणी केली जाते.
हेही वाचा - 'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'
कोरोनाकाळात बालकांची घेतली जाते काळजी
येथील महिला कर्मचारी जेव्हा 15 दिवसाच्या कामासाठी येतात तेव्हा त्यांना कुठला आजार तर नाही ना, त्यांच्या घरी कुणी कोरोनाबाधित तर नाही ना किंवा इतर कुठल्या आजाराची पार्श्वभूमीवर तर नाही ना याबाबत पूर्ण दक्षता घेतली जाते. त्यानंतर संस्थेतच त्यांची आंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजना केल्या नंतरच कर्मचाऱ्यांना संस्थेत प्रवेश दिला जातो. कोरोनाच्या काळात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थेत प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. स्वयंसेवक, भेट देणारे, दानशूर अशा व्यक्तींना या काळात संस्थेत प्रवेश दिला जात नाही. काही दानशूर व्यक्तींकडून फळे, भाजीपाला, औषध, दूध हे ठराविक वेळेसाठी बाहेरच क्वारंटाईन केले जाते. त्यानंतर स्वच्छ करून आतमध्ये घेतली जाते.
कोरोनाचा या काळात संस्थेमध्ये जेव्हा एखादे नवीन बालक येते तेव्हा त्याला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाते. त्याच्यासाठी वेगळ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाते. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्या मुलाला संस्थेतील इतर मुलांच्यात सोडले जाते. एखाद्या बालकाला काही वैद्यकीय अडचण असेल, उपचारासाठी त्याला बाहेर पाठवण्याची वेळ आलीच तर त्याच्या सोबत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबतच त्याला पाठवले जाते. त्यानंतर बाहेरून आत मध्ये आल्यानंतर त्या बाळाला क्वारंटाईन केले जाते. अशा प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेल्या सर्व उपाययोजना या संस्थेत केल्या जातात.
हेही वाचा - 'रेमडेसिवीर' तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक