पुणे - सप्तसूरातून उमटलेल्या 'बुद्धम् शरणम् गच्छामि'च्या नादाने अवघा आसमंत दुमदुमला. भन्तेनी केलेली धम्म वंदना, गायनातून सादर झालेला बुद्ध-भीमाचा महिमा यामुळे सोमवारची रम्य पहाट उजळून निघाली. प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या सुरेल गायनाने गौतम बुद्धांना स्वरांतून मानवंदना देण्यात आली. मिलिंद यांच्यासह मयूर शिंदे व सहकाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने बुद्ध उपासकांना मंत्रमुग्ध केले. भन्ते नागघोष यांनी धम्म वंदना करत 'बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि'चा जयघोष केला.
![buddha purnima specail dhamma phahat programme in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-budh-pornima-dhamma-pahat-avb-7210735_16052022105501_1605f_1652678701_249.jpg)
धम्म पहाट महोत्सव - बुद्ध जयंतीच्या (बौद्ध पौर्णिमा) निमित्ताने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात 'धम्म पहाट' महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी संयोजक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) संचालक धम्मज्योती गजभिये, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ अंकल सोनवणे, किरण सुरवसे, विठ्ठल गायकवाड, बंडगार्डनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आदी उपस्थित होते.
बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम - 'प्रथम नमो गौतमा चला हो' या गीताने धम्म पहाटची सुरवात झाली. 'वैशाखी पौर्णिमेला बुद्ध आले जन्मास', 'विश्व तारण्या महामानव बुद्ध आले जन्मा', 'महाकारुनी तथागताला त्रिवार हि वंदना', 'नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा', 'माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का', दोनच राजे इथे गाजले, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर', 'कालच्या महार वाड्याच भिमनगर झालंय गं' अशी एकापेक्षा एक भारी गीते सादर केली. दीपक म्हस्के यांच्या समर्पक व ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. अमोल जाधव, गणेश मोरे, राधिका अत्रे आदींनी साथसंगत केली. दिप किरण यांनी संगीत दिले.
कार्यक्रमात 16 वर्षांपासून सातत्य - "गेली १६ वर्षे हा धम्म पहाट कार्यक्रम घेतला जातो. कोरोनामुळे दोन वर्षे हा कार्यक्रम प्रत्यक्ष होऊ शकला नाही. यंदा मोठ्या उत्साहात ही धम्म पहाट होत आहे. जगाला बुद्धांनी दिलेली प्रज्ञा, शील, करुणा व शांततेची शिकवण आणि आंबेडकरांनी दाखवलेला प्रगतीचा मार्ग यावर आपण वाटचाल केली पाहिजे." शेकडो बुद्ध उपासकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून बुद्ध पूजा व त्रिसरण पंचशील घेत बुद्धांच्या विचारांना वंदन केले.अस यावेळी संयोजक परशुराम वाडेकर यांनी सांगितलं.