पुणे - लष्कराच्या एएफएमसीतील ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी 18 एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर स्वतःला धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी लष्करातील चार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी अनंत नाईक यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यातून हा प्रकार समोर आला आहे.
कोण आहेत हे ४ लष्करी अधिकारी
मेजर बलप्रीत कौर, मेजर निलेस पटेल, लेफ्टनंट कर्नल कुशाग्रा आणि ब्रिगेडियर ए. के श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरवातीला आत्महत्येची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अनंत नाईक यांचा मुलगा अभिषेक नाईक यांनी तक्रार दिली आहे.
नेमक काय आहे प्रकरण?
अनंत नाईक हे पुण्यातील एएफएमसी येथे हेड ऑफ द डिपार्टमेंट हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन येथे ब्रिगेडियर म्हणून कार्यरत होते. ते भुवनेश्वर येथील रहिवासी आहेत. 18 एप्रिल रोजी ते चालकासोबत पुणे रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यांनी चालकाला बाहेर थांबवून दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उद्यान एक्सप्रेस गाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या केली. ही माहिती मिळताच लोहमार्ग अधीक्षक सदानंद वायसे पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांची तपासणी केली. पण त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळाली नाही. यानंतर त्यांच्या मुलाला या घटनेची माहिती दिली.
नाईक यांच्या घरी सुसाईड नोट सापडली
दरम्यान याप्रकरणी लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत होते. यावेळी लोहमार्ग पोलिसांना नाईक यांच्या घरी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात 'मला या चौघांनी त्रास दिला, माझी विनाकारण चौकशी लावली, माझी चांगली प्रतिष्ठा खराब केली, कौर हिने आरोप केले', असे लिहिले आहे. त्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - थेट जर्मनीवरून 23 ऑक्सिजन प्लांट विमानाने होणार आयात- संरक्षण विभागाचा निर्णय