पुणे - कर्नाटकच्या मानगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा रातोरात हटवलेला पुतळा पुन्हा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे. मात्र, या मुद्द्यावरून ब्राह्मण महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्नाटक सरकारच्या या कृत्याचा निषेध करत त्यांनी कर्नाटक बँकेसमोर निदर्शनं केली आहेत. यावेळी कर्नाटक बँकेच्या मुख्य मॅनेजरच्या कक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवण्यात आली.
ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
कर्नाटक सरकारने आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवला नाही, तर या बँकेच्या महाराष्ट्रातील शाखा आम्ही बंद पाडू, असा इशारा ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी दिला आहे. या बँकेतील ग्राहकांना खाते बंद करण्याचे आवाहन दवे यांनी केले. त्याचबरोबर पुतळा बसेपर्यंत बँकेसमोर पोवाडा, मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आल्याचेही दवे यांनी सांगितले.