पुणे - अप्पा बळवंत चौक, केवळ पुण्यातच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात पुस्तके पोहोचवणारी सर्वात मोठी बाजारपेठ. एकट्या पुणे शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही पाच लाखांच्या घरात आहे. मात्र, कोरोनाच्या काळात चार महिन्यांचा लॉकडाऊन आणि विद्यार्थी आपापल्या गावी गेल्याने इथे दररोजची होणारी आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. थोडी थोडकी नाही तर तब्बल 70 टक्यांची घट येथील पुस्तक विक्रींमध्ये झाली आहे.
अप्पा बळवंत चौकात जवळपास 50 ते 60 दूकानातून आणि रस्ताच्या बाजूला असणारे स्टॉल याद्वारे पुस्तक विक्री केली जाते. परंतु, लॉकडाऊनमध्ये ही दुकाने बंद असल्यामुळे पुस्तकांची ऑनलाईन विक्री सुरू होती. मात्र, ऑनलाईन खरेदीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने दुकानांचे आर्थिक चक्र बिघडले. त्यामुळे दुकानदारांवर कामगार कपात करण्याची वेळ आली.
हेही वाचा - स्वच्छता सर्वेक्षण - 2020 : देशात इंदूर सर्वांत स्वच्छ शहर; तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
फक्त विद्यार्थी गावाकडे गेल्यामुळेच नव्हे, तर स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकांच्या बदलणाऱ्या आवृत्यांचाही या पुस्तक विक्रेत्यांना फटका बसला आहे. पाच महिन्यांपुर्वी खरेदी केलेली पुस्तके आता कोण घेणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने नुकसान झाले असतानाच दुसरीकडे आवृत्ती बदलली असल्यामुळे खरेदी केलेली पुस्तके आता तशीच पडून राहणार आहेत. त्यामुळे पुस्तक विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
अजुनही पुण्यात अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे क्लासेस बंद असल्यामुळे पुस्तके विकत घेण्यासाठी ग्राहक नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षा घेण्याची तयारी दर्शवली असली आणि वेळापत्रक जाहीर केले असले, तरीही विद्यार्थी शहरात लवकर येतील याची सूतराम शक्यता नाही. फक्त स्पर्धा परिक्षांचे नाही, यंदाचे शैक्षणिक वर्षही अजून सुरू झाले नाही. त्याचाही फटका येथील विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. शैक्षणिक वर्ष जर सुरू झाले नाही, तर पुस्तक विक्री व्यवसायाची घट 70 टक्क्यावरून 100 टक्क्यांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अप्पा बळवंत चौकात असलेल्या प्रगती बुक सेंटरचे मालक पंकज शहा याबाबत बोलताना म्हणाले की, लॉकडाऊनमुळे अनेकांवर आर्थिक संकट आले असल्यामुळे ग्राहकांची कमीतकमी खर्च करण्याची मानसिकता तयार झाली आहे. कोरोनाच्या आधी हाच ग्राहक पैसे खर्च करण्यासाठी तयार होता. अभ्यासाच्या पुस्तकांसोबतच अवांतर वाचनाची पुस्तके देखील ग्राहक घेत होते. त्यामुळे अर्थव्यवस्था चालत होती. परंतु कोरोनामुळे हे सर्व थांबले असून याचा फटका आम्हाला बसत असल्याचे पंकज शहा यांनी सांगितले.