पुणे - पुण्यात कोरोनासाठी तीन जम्बो हॉस्पिटल्स कधी सुरू होतील, याची टाईमलाईन सरकारने सांगावी. ते सुरू होईपर्यंत उद्यापासून पुण्यात कोणती सुविधा लोकांना उपलब्ध असेल, हे सरकारने सांगावे. त्यासाठी महापालिकेने त्यांचा वाटा उचलावा. पण, राज्य सरकारने महापालिकेला मदत करावी, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. शिवसेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. ‘माझं वाक्य उलटं करून वाचलं गेलं. जरी स्वबळावर सरकार आलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात’, असे मी म्हणालो होतो. सरकार येईल का माहिती नाही, पडद्यामागे काय चाललंय माहिती नाही. आम्हाला शिवसेना आणि कुणाचाच कुठलाही प्रस्ताव नाही, असेही ते म्हणाले.
महापालिका जम्बो हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारला पैसे देईल. सरकारनेही महापालिकेच्या पाठीशी उभे राहावे. खासगी रुग्णालयाबाबत सरकारने आदेश दिले तरीही खाटा ताब्यात नाहीत. त्यांना कडक आदेश दिले पाहिजेत. ऑक्सिजन, खाटा व व्हेंटिलेटरची कमतरता आहे. शासनाने महापालिकेलाही आर्थिक मदत केली पाहिजे, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.