पुणे - महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणावर आमदार सुनील कांबळे यांनी खुलासा करत म्हणाले की, मुळात जी क्लिप व्हायरल होत आहे ती माझी नसून मोडतोड करून जोडण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षापासून सर्वसामान्य माणसांमध्ये काम करणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला विरोधकांना काही मिळत नसल्याने आणि माझ्या विरोधात लढण जड जाणार असल्याने त्यांनी केलेले हे षडयंत्र आहे, असा खुलासा भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी केला आहे.
मार्केटयार्ड पोलीस चौकीत फिर्याद दाखल करणार -
जी क्लिप व्हायरल होत आहे. त्या क्लिपबाबत मी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करणार आहे. पोलीस त्यांचे काम करतील आणि ज्या कोणी अशा पद्धतीची ही क्लिप व्हायरल केली त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. पोलिसांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी यावर ठाम आहे की, ही क्लिप माझी नसून आवाज ही माझा नाही आहे. या क्लिपबाबत पक्षातील वरिष्ठांशी देखील चर्चा केली आहे, असे देखील यावेळी कांबळे यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण -
कथित एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करण्यात येत आहे. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात एक व्यक्ती मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क करतो. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेले व्यक्ती या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ही कथित ऑडियो क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमधील शिवीगाळ करणारे व्यक्ती हे कथितरित्या भाजप आमदार सुनील कांबळे असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र कांबळे यांनी हे आरोप फेटाळले आहे. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही असे कांबळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - असंस्कृतपणाचे कमळ भाजपाच्या चिखलातच उगवणार, रुपाली चाकणकर यांची टीका