पुणे - ऊर्जाखाते काँग्रेसकडे असल्याने त्यांची कोंडी केली जात आहे. यामाध्यमातून काँग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
नितीन राऊत यांनी 100 युनिटपर्यंत सवलत देण्याचे जाहीर केले होते. मात्र वाढीव बीजबिल माफीसाठी एसटीप्रमाणे पॅकेज मागितले जात आहे. तसे न झाल्याने नितीन राऊत यांना तोंडावर पाडण्याचे काम त्यांचे मित्रपक्ष करत असल्याचे दरेकर म्हणाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी शहरात आल्यानंतर दरेकर यांनी वाढीव वीज बिलावरून सरकारवर टीका केली.
वीज बिलांसंदर्भातील मेळावे उधळून लावू
वाढीव बिलं योग्य असल्याचे सांगण्यासाठी मेळावे घेतले जाणार आहेत. मात्र भाजपा हे ग्राहक मेळावे होऊ देणार नाही. ते उधळून लावू, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे. राज्यात शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शिक्षण मंत्री, राज्यमंत्री आणि सरकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरेकर यांनी मुंबई निवडणुकीवरून भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत हे पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेले दिसतात. फडणवीस यांनी विचारलेल्या आठ-दहा प्रश्नांवर राऊत बोलू शकले नाहीत. भाजपा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना, आमच्या पक्षात मराठी माणसं नाहीत का, असा प्रतिप्रश्न दरेकर यांनी केला.
भगवा हे शिवसेनेचं पेटंट नाही
भगवा झेंडा हे सेनेचं पेटंट नसून झेंडा कोणाच्या हातात द्यायचा हे जनता ठरवणार, असे दरेकर म्हणाले. मुंबई मनपा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली आहे. यासाठी मुंबईत भाजपा कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपावर भाजपाचा भगवा फडकणार असल्याचा दावा केला. यावर संजय राऊत यांनी टीका केली. आता पुन्हा प्रविण दरेकर फडणवीसांच्या बाजूने मैदानात उतरले असून त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'वर टीकास्त्र सोडले आहे.